'आजोबा हे बघा मी करंजी बनवायला शिकले." धनाढ्य उद्योगपती श्री गजानन थोरातांची किशोरवयीन लाडकी नात त्यांच्यासाठी डिश मध्ये 2 गरम करंज्या घेऊन आली होती.
"वाह! दिवसच बनवलास तू माझा.. ह्या करंजी पेक्षा जास्त गोड धक्का दिलास पोरी." हसत आपल्या नातीला कौतुकाने गजानन राव म्हणाले.
" असं नाही!! खाऊन सांगा. मग ठरवू दिवस बनला कि नाही ते. " ती उत्साहात म्हणाली.
"बरं बरं!!" गजानन रावांनी करंजीचा घास घेतला. पोरीने खरंच सुरस बनवली होती करंजी.
तोंड नॅपकिन ने पुसत आनंदी चेहऱ्याने गजाननराव म्हणाले.
"पोरी आईची आठवण करून दिलीस. तशीच चव गं." तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देत ते म्हणाले. घरातले सर्वजण तो कौतुक सोहळा बघत होते. गजानन रावांनी काही पाचशेच्या नोटा काढून नातीच्या हाती ठेवल्या.
"घ्या.. आमच्याकडून बक्षीस." मिशीत हसत ते म्हणाले.
सगळे निघून गेल्यावर डायनिंग हॉल मधुन दिवाणखान्यात दिसणाऱ्या आपल्या आईवडिलांच्या मोठ्या ब्लॅक अँड व्हाईट कॅनवास पेंटिंग कडे बघत गजानन राव भूतकाळात गेले. आईच्या सुरकुतल्या चेहऱ्यातील डोळ्यांमध्ये बघत त्यांना तो प्रसंग आठवू लागला.
****
क्रर्रर्रर्र खटक.. दाराचा कोयंडा निघाला. हळूच दार उघडलं गेलं.
हलकीछोटी पावले चुलीजवळच्या ओट्याकडे गेली. एका परातीत नुकत्याच तळलेल्या ताज्या करंज्या ठेवल्या होत्या. परातीवरच कापडाच अच्छादन निघालं. दोन करंज्या उचलल्या गेल्या. दार परत जैसे थे लावून बाहेर धूम ठोकण्यात आली.
सकाळी फक्त रात्रीच थोडं वरण आणि पोटभर पाणी पिऊन खेळत बसलेल्या 10च वर्षाच्या गजूच्या पोटात भुकेने आगडोंब उसळला होता. शेजारी राहत असलेल्या सख्या सधन चुलत्याच्या घरात करंज्यांचा घमघमाट सुटलेला त्याने श्वासात भरला होता. कदाचित चुलती एखादी करंजी देईल म्हणून त्याने त्यांच्या घरासमोर कितीतरी येऱ्याझऱ्या मारल्या. पण त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत ती करंज्या तळत तिच्या मुलांना खाऊ घालत होती. काही वेळाने बाहेर गेलेल्या चुलतीच्या घरात त्याने डाव साधत डल्ला मारला. बाहेर येऊन तो सरळ स्वतःच्या घरामागे आला.
करंजीचा मोठा घास त्याने तोंडात भरलाच होता. तेवढ्यात मागून त्याचं बखोट धरल्या गेलं.
"थूक ते!!" थंड चेहऱ्याने त्याची आई त्याला म्हणत होती.
त्याला भूक लागली होती. तोंडात घास होता. तो थुकला जाईल कसा? मिटल्या डोळ्यात पाणी घेऊन गजू तसाच उभा होता.
थाड थाड थाड!! आवाज घुमले. सोबत बांगड्या तुटल्याचा आवाज. त्याची आई स्वतःला मारून घेत होती. गजूने तोंडातला घास थुंकला. दुसरीही करंजी फेकून दिली. आईला घट्ट बिलगला. त्या बिलगण्यात सगळं समजावलं जात होतं. सगळं समजून घेतलं जात होतं.
आपला बाप जरी सक्षम नसला तरी तो आहे आणि तो आहे तोवर दुसऱयाला बाप बनवायचा नाही. आपला झगडा आपण लढायचा. त्यासाठी कुमार्गांवर जायचं नाही. हे तत्व तेव्हापासून अंगी बाणवलेल्या गजूने आयुष्यात कधीही आपल्या आई वडिलांची मान खाली जाणार नाही असे वचन स्वतःला दिले.
****
आई वडील तर सोडून गेले. पण त्यांच्याकडून मिळालेली शिकवण गजाननराव आजन्म विसरले नाही.
- शब्दभ्रमर 🍁🍁