#उन्हाळ्यातील_सुकुन ...
#ठंडा_ठंडा_कूल_कूल
नाचणीची आंबील
नाचणी...
यामध्ये आहारातील फायबरचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. त्याशिवाय त्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम देखील भरपूर असते, जे हाडांचे आरोग्य, पचन आणि रक्ताभिसरणासाठी फायदेशीर ठरू शकते.
नाचणी पीठाची आंबिल हा उत्कृष्ट आरोग्यदायी प्रकार आहे.😃
उन्हाळ्यात रोज आंबील ही माझ्या घरी होतेच.
जीव थंड करणारी आणि अतिशय पौष्टिक चवदार अशी ही आंबील कोल्हापुरच्या देवी यल्लमा किंवा रेणुका देवीच्या प्रसादात महत्वाचे स्थान पटकावून आहे 🙂
आपल्या पूर्वजांनी आपली खाद्यसंस्कृती, अनेक प्रथा, पौष्टिक आहार यांना खूप वैशिष्ट्यपूर्ण प्रकारे गुंफले आहे.
कोल्हापुरातील रेणुका देवीची"आंबील यात्रा" म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील "यल्लमा देवीची यात्रा"
‘उदं गं आई उदं’च्या गजरात कोल्हापुरातील घराघरातून भाजी-भाकरी आणि आंबील असा नैवेद्य घेऊन भाविक यल्लमा मंदिरात जातात. सर्वांना आंबील प्रसाद म्हणून वाटली जाते. भाद्रपदातील गौरी जेवणातही ‘आंबील’ आवश्यक असते. वास्तुशांत, पायाभरणी, विहीरपूजन, शांती अशाप्रकारांच्या अनेकविध पूजा या आंबिली शिवाय अपूर्ण असतात.
देवीला प्रिय असणारा हा प्रसाद शांती व सात्विकतेचे प्रतीक मानला जातो.
आपल्याकडे आंबील नाचणी, ज्वारी व ताकापासून केली जाते,तर गडचिरोली येथील आदिवासी त्यांच्याकडे जंगलात पिकत असलेल्या "मिलेट "ची आंबील बनवितात.
सर्वसामान्य ते अती श्रीमंत अशा सर्वांच्याच आहारात आंबिलीला महत्त्वाचे स्थान आहे.
आंबीली सारखा पौष्टिक पदार्थ सर्वांसाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी अतिशय उपयोगाचा आहे.
नाचणीची आंबील
साहित्य - दोन चमचे नाचणी पीठ, मीठ, जिरे, हींग (लसूण पाकळ्या आवडीनुसार), ताक.
कृती
१. रात्री दोन चमचे नाचणीचे पीठ थोड्याशा पाण्यात किंवा ताकात भिजवावे.
२. सकाळी दोन ते अडीच पेले पाण्याच्या आधणात मीठ, जिरे, व हींग घालून उकळत ठेवावे
भिजवलेले नाचणीचे पीठ हळूहळू ओतत एकसारखे ढवळत शिजवून घ्यावे.
३. लसूण घालायचा असेल तर आच बंद करून लसूण तसाच ठेचून किंवा तेलावर परतून घालावा.
४. थंड झाल्यावर ताक घालून अथवा ताक ना घालता सुध्दा आंबील छान लागते.
आपल्या आवडीप्रमाणे घट्ट अथवा पातळ करता येते.
त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढविणे.
सुरवातीला पातळ दिसणारी ही आंबिल नंतर त्यातील नाचणी पीठ फुगून घट्ट होते
ज्यांना लसणाचा उग्र वास आवडत नाही त्यांनी नुसते जिरे, हींग घालून केलेली आंबिल घ्यावी.
गारेगार आंबिलीच्या पहील्या घोटातच शीतल थंडगार अशी तृप्ती मिळते ती संपुर्ण तन मन व्यापून जाते 😋
सजावट पुदीना